खेड:- तालुक्यातील धामणंद गावठाण म्हापदीवाडी येथे दि. ९ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून भूषण प्रकाश चांदे यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल काढून घेतल्याप्रकरणी एका विरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील धामणंद गावात दि. ९ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास गाय चरण्यासाठी सोडून भूषण प्रकाश चांदे ( वय ३१, रा. धामणंद गावठाण म्हापदीवाडी ) हे त्यांच्या घरी परतत असताना भगवान सखाराम कदम ( वय ५०, रा. धामणंद ) हे अचानक त्यांच्या पाठीमागून आले व त्यांनी भूषण चांदे यांना मिठी मारून त्यांना त्यांच्या घराच्या पडवीत घेऊन गेले. त्या ठिकाणी खांबाला दोरीने बांधून ठेऊन कोयतीचा धाक दाखवत पोटात हाताच्या ठोशाने मारहाण केली. त्यावेळी भूषण यांचे वडील प्रकाश व आई प्रतिमा त्यांना सोडवण्यासाठी आले असता लाकडी काठीने भूषण यांच्या वडिलांच्या हातावर मारहाण करण्यात आली. तसेच भूषण यांचा सुमारे चार हजार रुपये किमतीचा मोबाईल भगवान कदम यांनी जबरदस्तीने काढून घेतला, असे भूषण चांदे यांनी खेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.









