रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नौका बुडाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. खराब वातावरणामुळे नौकेत पाणी भरले आणि ही नौका बुडाली. नौकेवरील दोन खलाशांना मत्स्य विभागाने कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू करत त्यांचे प्राण वाचवले.
मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसासोबत वाऱ्याचा वेगदेखील आहे. समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्र देखील खवळला असून पाण्याला करंट आहे. याचाच फटका पूर्णगड समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकेला बसला आहे. विनोद भागवत नामक मालकाची ही नौका असल्याची माहिती मिळाली आहे. ही नौका लोखंडी होती असे येथील स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. या मासेमारी नौकेवर दोन खलाशी होते. पूर्णगड समुद्रात १२ वाव अंतरावर ही नौका मासेमारी करत होती. यावेळी समुद्रातील वातावरण खराब झाल्याने बोटीत पाणी भरण्यास सुरुवात झाली. बोटीत पाणी भरण्यास सुरुवात होताच बोटीतील खलाशांनी तत्काळ बोटीवर चढून मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छीमारांनी मत्स्य विभागाशी संपर्क केला.
पूर्णगड समुद्रात बोट बुडत असल्याची माहिती मत्स्य विभागाचे अधिकारी आनंद पालव यांना देण्यात आली. आनंद पालव यांनी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरच्या मदतीसाठी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या कानावर ही बाब घातली. ना.सामंत यांनी क्षणाचाही विलंब न लावता कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांनी खलाशांच्या रेस्क्युसाठी हेलिकॉप्टर रवाना केले. अखेरच्या क्षणी हेलिकॉप्टरच्या मदतीने बुडणाऱ्या बोटीवरील दोघा खलाशांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले.









