खेड:- मालकीच्या जमिनीवर पुजेला विरोध केल्याच्या रागातून एका प्रौढाला मारहाण केल्याप्रकरणी ६ जणांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २८ फेब्रुवारीला दुपारी आंबडस येथे घडला.
या प्रकरणी चंद्रकांत राजाराम करंजकर (५०) गवळवाडी यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल दिली आहे. यातील चंद्रकांत करंजकर हे घरी असताना वाडीतील काही ग्रामस्थ करंजकर यांच्या मालकीच्या जमिनीत पूजा घालण्याची तयारी करत होते. या वेळी करंजकर यांनी त्या ग्रामस्थांना सांगितले की, माझ्या जागेत पूजा घालायची नाही. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पूजा घाला, असे सांगितले असता त्यांना याचा राग येऊन त्या ठिकाणी हजर असलेले संशयित ऋषिकेश रवींद्र करंजकर, राहुल राजेंद्र करंजकर, साहिल सुभाष करंजकर, राजेंद्र गोविंद करंजकर, सुभाष गोविंद करंजकर, अशोक तुकाराम खेडेकर (सर्व रा. आंबडस गवळवाडी, ता. खेड) यांनी फिर्यादी यांना मारहाण केली. त्यांना सोडवण्यासाठी त्यांची पत्नी अस्मिता, मुलगा दीपेश व त्यांचा भाऊ श्रीकांत हे आले असता त्यांनाही संबधितांनी शिवीगाळ, दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.