पुर्णगड येथे घरगुती वादातून सासूने सुनेला केली मारहाण

सासऱ्याकडून जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी:- घरात कचरा काढण्यावरून झालेल्या किरकोळ वादाने रत्नागिरी तालुक्यातील पुर्णगड येथे अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले. सासूने सुनेला कपडे वाळत घालण्याच्या लाकडी काठीने अमानुषपणे मारहाण केली, तर सासऱ्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन तिला घराबाहेर ढकलले. या घटनेत सून गंभीर जखमी झाली असून, तिच्या डाव्या डोळ्याखाली मोठी जखम झाली आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैष्णवी वैभव चव्हाण (वय ३६, व्यवसाय गृहिणी, रा. पुर्णगड बाजारकरवाडी) या फिर्यादीनुसार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी अंदाजे १०:३० वाजता त्या आपल्या घरी नाश्ता करत असताना आरोपी क्रमांक १, सासू वैशाली वसंत चव्हाण (वय ६५) यांना त्यांनी ‘तुम्ही कचरा काढू नका, मी काढते,’ असे सांगितले. याच क्षुल्लक वाक्यावरून वैशाली चव्हाण यांचा संताप अनावर झाला. त्यांनी तातडीने जवळ असलेली लाकडी काठी घेतली आणि सून वैष्णवी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी वैष्णवी यांच्या दोन्ही हातांवर, पाठीवर, आणि डोक्यावर जोरदार प्रहार केले. विशेषतः, याच मारहाणीत काठीचा फटका वैष्णवी यांच्या डाव्या डोळ्याखाली लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

दरम्यान, आरोपी क्रमांक २ असलेले सासरे वसंत आत्माराम चव्हाण (वय ७७) यांनीही या भांडणात हस्तक्षेप करत सुनेला शिवीगाळ केली आणि हाताने ढकलाबुकली केली. तसेच, त्यांनी ‘ठार मारण्याची धमकी’ देऊन वैष्णवी यांना घराबाहेर ढकलून दिले, असे फिर्यादीत नमूद आहे.

घटनेनंतर जखमी वैष्णवी चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यात आली असून, त्याच दिवशी (दि. २३/०९/२०२५) दुपारी १५:४० वाजता सासू वैशाली आणि सासरे वसंत चव्हाण यांच्याविरुद्ध गु.आर.नं. ६७/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१) (इजा पोहोचवणे), ३५२ (गुन्हेगारी बळाचा वापर), ३५१(१) (मारहाण), आणि ३(५) (गुन्हेगारी धमकावणे) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून सुनेला थेट जीवे मारण्याची धमकी आणि मारहाण झाल्याने रत्नागिरी परिसरात या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.