पुरलेला महाकाय मृत व्हेल पुन्हा वाळूवर

मांडवी किनार्‍यावर दुर्गधी; भरतीमुळे खोदकामात अडथळा

रत्नागिरी:- समुद्राच्या लाटांच्या प्रेशरने दहा फुट वाळूत पुरलेला महाकाय व्हेल माशाचा मृतदेह काही तासातच वर आला. तो सडलेला असल्यामुळे मांडवी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मासा पुन्हा वाळूत पुरण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाली आहे. त्या माशाचा पंधरा दिवसांपूर्वीच समुद्रात मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचा बराचसा भाग कुजलेला असल्याने व्हेलचा मृत्यू कशामुळे झाला हे सांगणे अशक्य असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

शनिवारी (ता. 20) दुपारी मांडवी समुद्र किनारी व्हेल मासा मृत स्थितीत आढळून आला. गेल्या काही दिवसांमध्ये कोकण किनार्‍यावर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. किनार्‍यापासून पाण्यात काही अंतरावर मासा असल्यामुळे त्याला बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे भरतीच्या पाण्याबरोबर किनार्‍यावर मृत मासा येण्याची वाट पहावी लागली. पहाटे तीन वाजेपर्यंत मासा किनार्‍यावर आला. त्यानंतर वन विभाग आणि पोलिस यंत्रणेने स्थानिकाच्या सहकार्याने दोन जेसीबी लावून किनार्‍यावरील वाळूत खड्डा खणून मासा पुरण्यात आला. सुमारे दहा फुटाहून अधिक खोल खड्ड खणलेला होता. मात्र काही तासानंतर भरतीच्यावेळी पुन्हा मासा वरती आला. कुजलेल्या अवस्थेतील मासा उघड्यावर आल्यामुळे किनारी भागात दुर्गंधी पसरलेली होती. मृत माशाला पुरण्यासाठी अपेक्षित खड्डा खोदलेला नसल्याचे स्थानिकांचे मत आहे. प्रशासनाने घाई केल्यामुळे हा प्रकार झाल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले.
पुरलेला मासा पुन्हा वर आल्याचे समजल्यानंतर वन विभागाकचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोकलेनच्या साह्याने मोठा खड्डा खोदण्याचे काम सायंकाळी हाती घेण्यात आले होते. वाळूत खोदाई सुरु केल्यानंतर पाणी येत असल्यामुळे या कामात वारंवार अडथळे येत होते. तसेच खोदलेला खड्डा पाण्याबरोबर पुन्हा वाळूने भरला जात होता. उशिरापर्यंत ही कार्यवाही सुरू होती.

व्हेलचा मृत्यू पंधरा दिवसांपूर्वीच खोल समुद्रात झाल्याचा अंदाज आहे. त्याचा मृत्यू कशामुळे झाला असावा हे सांगणे शक्य नसल्याचे पाहणी केल्यानंतर पशु अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे. याला वन विभागाने दुजोरा दिला आहे. किनार्‍यावरील व्हेल कोणत्या प्रजातीमधील आहे हे ओळखणेही कठीण असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.