पुररेषेतील कुटूंबांच्या स्थलांतरासाठी 127 निवारा केंद्र

प्रशासन सज्ज; पूर आल्यास 15 हजार 31 लोकांचे स्थलांतर

रत्नागिरी:- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा कोकण किनारपट्टीकडे सरकत असून रविवारपर्यंत जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यासाठी पुररेषेतील 15 हजार 031 लोकांच्या स्थलांतरासाठी 127 निवारा केंद्र सज्ज ठेवली आहेत. जिल्ह्यात नदी, समुद्र, खाडी किनार्‍यावर 153 गावे वसलेली आहेत.

निसर्ग, तौक्ते या दोन चक्रीवादळांवेळी जिल्हा प्रशासनाने वेळीच दक्षता घेतल्यामुळे जीवीतहानी टाळता आली होती. त्याचप्रमाणे हवामान विभागाने चार दिवसांपूर्वी कोकणात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली होती. प्रचंड पाऊस झाल्यास कोकणातील नद्यांना महापूर येऊ शकतो, हे लक्षात घेऊन पुर रेषेतील भागांमधील स्थलांतर करण्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यात किनारी भागातील 153 गावे आहेत. त्यात 2 लाख 62 हजार 277 लोक राहतात. पुररेषेत येणार्‍या घरांची संख्या 11 हजार 387 आहे. त्यामध्ये बाधित होणार्‍या कुटूंबांची संख्या 5 हजार 562 असून तेथील लोकसंख्या 17 हजार 054 आहे. त्यातील सुमारे 15 हजार लोकांचे स्थलांतर करावे लागू शकते. या लोकांची व्यवस्था करणसाठी सुरक्षित अंतरावरील 127 ठिकाणे प्रशासनाने निश्‍चित केली आहेत. या शिवाय 253 नातेवाईक व शेजार्‍यांच्या सुरक्षित घरी स्थलांतरीत होणार आहेत. कोकणवासीयांना मुसळधार पाऊस हा नवीन नसला तरीही गेल्या काही वर्षात नदीकिनारी वसलेल्या चिपळूण, राजापूर, खेड शहरांना पूराचा तडाखा बसत आहे. ढगफुटीसारख्या पावसात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून दरडप्रवण आणि पुरप्रवण भागात कडक निर्बंध घातले आहेत.