पुढील दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

रत्नागिरी:- जिल्ह्यात 11 व 12 एप्रिलला काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. गेले तिन दिवस सकाळी ढगाळ वातावरण असून पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पावसाने आंबा हंगामाला फटका बसला होता. त्यानंतर पुढे मार्च महिन्यात तापमानाचा पारा 40 अंशापर्यंत वर गेला. एप्रिल महिन्यातही तीच परिस्थिती आहे.
पारा अधिक असल्यामुळे उष्म्याची तिव्रता वाढलेली आहे; मात्र सायंकाळी पारा 24 अंशापर्यंत खाली येतो. हलकी थंडी जाणवत आहे. उष्णतेमुळे पावसाची शक्यता वर्तविली जात असून त्याला पुरक वातावरण जिल्ह्यात तयार झालेले आहे. गेले तिन दिवस सकाळच्या सत्रात ढगाळ वातावरण आहे. दहा वाजेपर्यंत आभाळ भरुन येते; मात्र दुपारी पुन्हा कडाक्याचे उन्ह पडते. या अनियमित वातावरणाचा परिणाम आंब्यावर होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 11 व 12 एप्रिलला जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार पाऊस पडला तर त्याचा परिणाम हापूसवर होऊ शकतो. याच कालावधीत मोठ्याप्रमाणात आंबा तयार होऊ शकतो. पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून दुसर्‍या टप्प्यातील फळाची बागायतदारांना प्रतिक्षा आहे. त्याचवेळी अवकाळी पाऊस झाला तर मोठे नुकसान होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे.