राजापूर:- डिजिटल युगामध्ये अॅन्ड्राईड मोबाईलच्या साहाय्याने ”ई-पिकपाहणी अॅप”द्वारे पीकपेरा नोंदणी करण्याला शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. या महिनाअखेरपर्यंत (ता. २८) ही पीकपेरा नोंदणी करण्याची शेतकऱ्यांना संधी मिळाली असून खरीपाच्या जोडीने शेतकऱ्यांना आता रब्बी पिकाचीही नोंदणी करता येणार आहे.
शेतामध्ये लागवड केलेल्या पिकासह शेतातील अन्य नोंदीच्या नोंदी यापूर्वी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांमार्फत केल्या जात होत्या; मात्र, सध्याच्या डिजिटल युगामध्ये त्यामध्ये बदल होताना पीक पेरणीच्या या नोंदी आता शेतकरी स्वतःच्या अॅन्ड्रॉईड मोबाईलवरून विकसित केलेल्या ई-पीक पाहणी अॅपद्वारे करीत आहेत. त्या द्वारे डिजिटल युगामध्ये ई-पीकपाहणी अॅपद्वारे शेतकरी हायटेक होऊ लागला आहे. ”माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा” या घोषवाक्याच्या आधारे शासनाने सुरू केलेल्या ई-पीकपाहणी करण्याची सुरवात १५ ऑगस्टला करण्यात आली होती. या अॅपच्या माध्यमातून पिकपेरा नोंदणी करताना विविध कारणांमुळे अडथळे आणि अडचणी आल्या असल्या तरी अनेक शेतकरी खातेदारांनी त्यामध्ये नोंदणी केली.
या पिकपाहणी नोंदणी करण्याची १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. सद्यःस्थितीमध्ये रब्बी हंगाम सुरू आहे. या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना पिकपेरा नोंदणी करता यावी, या अनुषंगाने शासनाने ई-पीक पाहणी नोंद करण्याच्या मुदतीमध्ये वाढ केली आहे. या महिना अखेरपर्यंत असलेल्या या ई-पीक पाहणी नोंदणी करण्याची मुदत असून त्यामुळे शेतकऱ्यांना आता रब्बी पिकांचीही नोंद करणे सोपे झाले आहे.