रत्नागिरी:- पावस ते गावडे आंबेरे जाणार्या रस्त्यावर विरुध्द बाजुला एसटीला समोरुन धडक देणार्या दुचाकिस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी १० वाजण्याचा सुमारास घडला.
या अपघातात चालक विनित अनिल गोताड (५०, रा.गवळीवाडा,रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची फिर्याद एसटी चालक माणिक गंगाधर दहीफळे यांनी पूर्णगड पोलीस स्थानकात दिली. एकटी चालक दहिफळे शुक्रवारी सकाळी आपल्या ताब्यातील एसटी (एमएच १४ बीटी ०१८०) घेउन हर्चे-पावस ते रत्नागिरी असे येत होते. त्याच सुमारास विनित गोताड आपल्या ताब्यातील होंडा शाईन (एमएच ०८ एआर ००४६) घेउन भरधाव वेगाने पावस ते गावडे आंबेरे असे जात होते. ही दोन्ही वाहने स्वामी भक्तनिवास येथील वळणावर आली असता गोताड यांचा आपल्या दुचाकिवरील ताबा सूटला आणि त्यांनी रस्त्याच्या विरुध्द बाजुला येत समोरुन येणार्या एसटीला ड्रायव्हर बाजुला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती कि त्यात विनित गोताड यांचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून पूर्णगड पोलीस स्थानकात अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे.अधिक तपास पोलीस हेडकाॅस्टेबल संदेश चव्हाण करत आहेत.