पावस येथे आंबा व्यवसायिकाला दमदाटी; चौघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- पावस येथील ऑफिसमध्ये येऊन आपण पोलिस असल्याची बतावणी करून पैशाच्या स्वरूपात खंडणीची मागणी केल्याप्रकरणी व मालमत्तेचे नुकसान करण्याची धमकी देऊन शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी चौघांविरूद्ध पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी तुषार प्रदीपकुमार कुकरेजा व फिर्यादी अभिषेक सुहास शिंदे यांची आंबा व्यवसायातून ओळख होऊन २०२४ मध्ये त्यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद चालू आहेत. त्या वादाच्या रागातून तुषार कुकरेजा याने चारचाकी वाहनाने मिलन कांकरिया, पिंटू बोरा व एक अनोळखी असे चौघेजण अहिल्यानगर येथून पावसमध्ये २७ ऑगस्ट रोजी आले. ते पावस येथील अभिषेक सुहास शिंदे यांच्या कार्यालयात गेले. तिथे संशयितांनी आपण पोलिस असल्याची बतावणी करून शिंदे यांच्याकडे खंडणी स्वरूपात पैशांची मागणी केली व मालमत्तेचे नुकसान करण्याची भीती दाखवली. तसेच शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी शिंदे यांनी तक्रारी दिली.