पावस मार्गावर अपघाताचा फायदा घेत कारमधील 1 लाख 21 हजारांचा मुद्देमाल लांबवला

रत्नागिरी:-रत्नागिरी ते पावस जाणार्‍या रस्त्यावर कार आणि टेम्पोमध्ये झालेल्या अपघातावेळी गर्दीचा फायदा उठवत अज्ञाताने कारच्या सीटवरील पर्ससह 1 लाख 21 हजार 675 रुपयांचा मुद्देमाल लांबवला.

अपघाताची ही घटना मंगळवार 24 मे रोजी दुपारी 3.20 वा.घडला होता.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गजानन भगवान डोंगरे (44, रा. जालना) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, जालनाहून गजानन डोंगरे आपला चालक आणि कुटुंबियांसोबत स्विफ्ट डिझायर कार घेउन रत्नागिरी-सिंधुदुर्ग फिरण्यासाठी आले होते. 24 मे रोजी ते गणपतीपुळे येथे फिरून पावस मार्गे देवगडला जात होते. ते कसोपसडा येथे आले असता पुढील रिक्षा टेम्पो वळण घेत असताना चालकाचा कारवरील ताबा सूटला आणि त्याने पुढील टेम्पोला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर कार रस्त्याच्या खाली उतरुन अपघात झाला होता. त्यामुळे रस्त्यावर जमाव गोळा झाला होता. तसेच अपघातामुळे डोंगरे कुटुंबियही घाबरुन गाडीपासून काही अंतरावर येउन थांबले होते. या संधीचा फायदा उठवून जमावातील अज्ञाताने त्यांच्या कार सीटवरील पर्स लांबवली.

दरम्यान डोंगरे कुटुंबिय अपघातातून सावरल्यानंतर रत्नागिरीत परतले. त्यांनी काँग्रेस भवन येथील नभा लॉजमध्ये रुम बुक केल्यानंतर सामानाची तपासणी केली . तेव्हा त्यांना डायमंड नेकलेस असलेली पर्स मिळून आली नाही. या पर्समध्ये रोख 5 हजार 200 रुपये आणि 1 लाख 16 हजार 475 रुपयांचा डायमंड नेकलेस असा एकूण 1 लाख 21 हजार 675 रुपयांचा मुद्देमाल होता.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार घोसाळे करत आहेत.