रत्नागिरी:- जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय झाल्यापासून मुसळधार पावसाने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या पावसामध्ये पाण्यात बुडून आणि वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. तर संरक्षक भिंत कोसळून व अन्य घटनांनी पाच जखमी झाले. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, रस्ते खचले, पुलांना बाधा झाली, झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. १३० कच्च्या व पक्क्या घरांचे सुमारे ४४ लाखांचे नुकसान झाले तर सार्वजनिक मालमत्तांचे जवळपास एक कोटीहून अधिक असे सर्व मिळून दीड कोटींचे नुकसान झाले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालामध्ये हे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने इशारा पातळीवर वाहणाऱ्या नद्यांचे पाणीदेखील ओसरले आहे. अनेक ठिकाणी आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. आजपर्यंत सरासरी १०४३.३९ मिमीएवढ्या पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये राजेश चिमाजी जाधव (वय ४५, गोविळ, ता. लांजा) येथे वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. राजेंद्र सोनू कोळंबे (वय ४९, वाणंद, ता. दापोली) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यात काजरघाटी खुर्द बौद्धवाडी येथे घराची संरक्षक भिंत कोसळून तीन झोपड्यांवर पडून आशा राठोड, मोहन राठोड, रोहन जाधव हे जखमी झाले. आबलोली मार्गावर झाड पडून आदेश नाटेकर, साई हरचेरकर यांना दुखापत झाली होती.
नागरिकांच्या स्थलांतराबाबतचा रकाना अहवाल कोरा आहे. दरडप्रवण आणि पूरप्रवण क्षेत्र यापैकी जिल्ह्यातील एकाही कुटुंबाला स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आलेल्या नाहीत. जास्त पाऊस सुरू झाल्यानंतर साधारण जुलैमध्ये अतिवृष्टीत धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास स्थलांतराच्या नोटिसा देण्यात येतील, असे प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत असल्याचा अहवाल आहे. मालमत्तेच्या झालेल्या नुकसानामध्ये अंशतः कच्चे २ घरांचे ९३ हजाराचे नुकसान झाले आहे. तर अंशतः १२८ पक्क्या घरांचे सुमारे ४३ लाखांचे नुकसान झाले आहे. तीन पूर्णतः गोठ्यांचे ७१ हजार व १३ अंशतः गोठ्यांचे ६ लाख २६ हजाराएवढे नुकसान झाले आहे. पशुधनामध्ये १ जनावर दगावले आहे. एनडीआरएमचे १ पथक रत्नागिरीत आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, पाणीपुरवठा विभागाचे मिळून एक कोटी १३ लाखांहून अधिकचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद शाळांचे सव्वा लाखांचे, अंगणवाड्यांचे वीस हजार, जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत रस्ते व संरक्षण भिंतींचे सर्वाधिक ५३ लाखांचे नुकसान झाले आहे. पूल, मोर्या, कॉजवेचे दीड लाखाहून अधिक, साकवांचे ३२ हजाराचे नुकसान नोंद झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुमारे रस्ते व संरक्षण भिंतीचे २७ लाखाहून अधिक, पूल व मोऱ्यांचे पाच लाखांचे नुकसान झाले असून, महावितरणचे १८ लाखांचे नुकसान झाले आहे. पाणीपुरवठा विभागाचे साडेसहा लाखांचे नुकसान झाले आहे.