लांजा:- गोवा राज्यातील पत्रादेवी येथे अपघात करून मुंबईच्या दिशेने पळणाऱ्या कंटेनर चालकाला लांजा पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून पकडले .
मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा तालुक्याच्या हद्दीतील कुवे येथे गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कंटेनर (क्र. एमएच १२ व्हीटी ७०४८) चालकाने पत्रादेवी गोवा येथे अपघात करून तो भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने जात असल्याची खबर गुरुवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास निरीक्षक निनाद देऊलकर (मोपा एअरपोर्ट पोलीस स्टेशन गोवा) यांनी लांजा पोलीस ठाण्याला दिली होती. तसेच या कंटेनरला पकडण्यासाठी तुमची मदत मिळावी. आमचा पोलीस कर्मचारी पाठीमागून येत असल्याची माहिती त्यांना दिली होती. यानंतर लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांच्या सुचनेप्रमाणे ११२ चे वाहनाने पोलीस कॉन्स्टेबल आर्डे व चालक पोलीस कॉन्स्टेबल बजागे तसेच ट्रॅफिक पोलीस भुजबळराव, पोलीस कॉन्स्टेबल पवार, पोलीस कॉन्स्टेबल नाईकवाडे हे शोध घेण्याकरिता रवाना झाले. या दरम्यान ११२ गाडीतून रवाना झालेले पोलीस कॉन्स्टेबल आर्डे व चालक पोलीस कॉन्स्टेबल बजागे यांना कुवे येथे हा कंटेनर गोवा-मुंबई महामार्गाने जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी या कंटेनरचा पाठलाग करून पकडले. त्यातील चालक अजीम खान (वय २५, राहणार जामपाखरी चौबे पोस्ट जमता साई बस्ती उत्तर प्रदेश, (मोहम्मद शमीन खान यांच्याकडे राहतो) याला कंटेनरसह लांजा पोलीस ठाण्यात आणले. यानंतर काही वेळातच लांजा पोलीस ठाणे येथे दाखल झालेल्या मोपा एअरपोर्ट पोलीस स्टेशन, गोवा पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद पोटे, पोलीस कॉन्स्टेबल गोरे यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले.









