पावसाचे थैमान सुरूच; बावनदीने ओलांडली धोक्याची पातळी

बावनदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद, वाहनांच्या रांगा

रत्नागिरी:- जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान सुरूच आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्यात अनेक भागात पुराचे पाणी घुसले आहे. संगमेश्वर तालुक्यातील बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

 बावनदीची धोका पातळी 11 मीटरवर असून सद्यस्थितीत बावनदीची पाणी पातळी धोका पातळी ओलांडून 11.30 मीटरवर आहे. त्यामुळे बावनदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पूल बंद करण्यात आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. याशिवाय जगबुडी नदी देखील धोका पातळीवर वाहात आहे. वशिष्टी, काजळी, कोदवली, शास्त्री, सोनवी, मुचकुंदी या नद्याना देखील पूरस्थिती आहे.