पावसमध्ये बँकेने सील केलेले घर फोडून अतिक्रमण

कर्जदारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे न्यायालयाने नियुक्त केलेल्या कोर्ट कमिशनरनी पोलीस बंदोबस्तात सील केलेले घर बेकायदेशीरपणे फोडून त्यात प्रवेश केल्याप्रकरणी पावस येथील तिघांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वामी स्वरूपानंद मंदिराजवळ असलेल्या एका घरावर ही कारवाई करण्यात आली होती.

​मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी दिनेश भरत बाणे (वय ४०) यांनी ‘राजापूर अर्बन को. ऑप. बँक’ शाखा रत्नागिरी येथून व्यवसायासाठी २० लाख रुपयांचे मुदत कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्यांनी पावस येथील राहते घर (ग्रा.पं. घर क्र. १२३८) आणि जमीन तारण ठेवली होती. मात्र, कर्जाची परतफेड न केल्याने आणि मालमत्तेचा ताबा न दिल्याने बँकेने मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, रत्नागिरी येथे धाव घेतली होती.

​न्यायालयाच्या आदेशानुसार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी कोर्ट कमिशनरची नियुक्ती करण्यात आली. २९ मार्च २०२६ रोजी पोलीस संरक्षणात हे घर अधिकृतपणे सीलबंद करून त्याचा ताबा बँकेकडे सोपवण्यात आला होता. ही प्रक्रिया पंच आणि कर्जदाराच्या समक्ष पार पडली होती.

बँकेचे कर्जवसुली अधिकारी लक्ष्मण गणू म्हात्रे (वय ५६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २९ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत आरोपींनी संगनमत करून घराच्या दर्शनी दरवाजाचे सीलबंद कुलूप तोडले. तसेच घराच्या खिडक्या उघडून आणि मागील बाजूच्या संडास-बाथरूमचे सील तोडून बेकायदेशीर प्रवेश केला. इतकेच नव्हे तर घराच्या अंगणात कपडे वाळत घालून आणि भांडी ठेवून या सीलबंद मालमत्तेवर पुन्हा अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर दिनेश भरत बाणे (वय ४०), भरत महादेव बाणे (वय ६९), एक महिला (वय ६५ सर्व रा. पावस, स्वामी स्वरूपानंद मंदिराजवळ, रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

​याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३२९(४), ३२४(२), ६२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून सरकारी प्रक्रियेने लावलेले सील तोडल्यामुळे या प्रकरणाची परिसरात चर्चा सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.