पाली येथे जमिनीच्या वादातून तरुणाला मारहाण

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली-वडाचे भाटले येथील जमिनीची मोजणी सुरु असताना जमाव करुन मारहाण व धमकी देणाऱ्या पाच जणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक विश्राम सावंत, मिलींद गंगाराम सावंत, मोहन बारक्या सावंत, मुग्धांक रवींद्र सावंत, अविनाश गंगाराम सावंत अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (ता. १५) दुपारी पावणे दोनच्या सुमारास पाली-वडाचे भाटले येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी भरत रामचंद्र सावंत (४५) यांच्या व संशयित यांची पाली-वडाचे भाटले या ठिकाणी जमीन जागा मोजणी सुरु होती. त्यावेळी फिर्यादी भरत सावंत हे देखील मोजणीसाठी हजर राहिले होते. त्यावेळी संशयित पाच जणांनी जमाव करुन या जागेत पाय टाकायचा नाही असे बोलून संशयित अशोक सावंत यांनी फिर्यादी यांची क़ॉलर पकडली आणि उर्वरित चार जणांनी हाताने मारहाण करुन धकलाबुकल करुन तंगड्या तोडून टाकीन अशी धमकी दिली. तसेच घरी जाऊन फिर्यादी यांच्या आईस व काकीस दमदाटी केली. या प्रकरणी भरत सावंत यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.