रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती पाली बाजारपेठे लगत असणार्या मराठवाडीतील घरात कोणी नसताना मागील दरवाजा संध्याकाळच्या सुमारास फोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले दहा तोळे सोन्याचे दागिने दागिने व रोख रक्कम असा मिळून ४ लाख ८८ हजार ०७५ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी घरफोडी करून चोरून नेला आहे. या धाडसी चोरीच्या घटनेमुळे पाली सह विभागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पाहावयास मिळत आहे.
या चोरीच्या संदर्भात पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, पाली बाजारपेठे नजीकच्या मराठवाडीमधील रमेश मधुकर सावंत यांच्या घरात काल ता.१९ रोजी सायंकाळी ५.३५ ते ७.१५ वाजण्याच्या दरम्यान कोणीही नसताना अज्ञात चोरट्याने घराचा मागील बाजूचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. यामध्ये मंगळसूत्र २९ ग्रॅम, बांगड्या ४० ग्रॅम, चैन ८.५ ग्रॅम,डूल १.७ ग्रॅम,हार १० ग्रॅम,कानवेल १ग्रॅम, सोन्याचा टॉप ४ ग्रॅम,चैन २ ग्रॅम असे सर्व मिळून जवळपास १० तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम रूपये ३,५०० असे एकूण चार लाख आठ्याऐंशी हजार पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लांबविला आहे.रमेश सावंत हे रिक्षा व्यावसायिक असल्याने ते व त्यांचा मुलगा व पत्नी हेही कामानिमित्त घराबाहेर गेलेले असतानाच अज्ञात चोरट्याने अचूक वेळ साधत ही धाडसी चोरी केलेली आहे. चोरीची घटना घडलेले ठिकाण हे वस्तीत असूनही चोरी झालेले असल्याने खळबळ उडाली आहे.
या चोरीच्या घटनेनंतर घटनास्थळी तातडीने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव,पाली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे,महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल तृप्ती सावंतदेसाई,पोलीस हेडकॉन्स्टेबल उदय बांगर, पोलीस कॉन्स्टेबल सूर्याजी पाटील,दर्शना शिंदे याचबरोबर फॉरेन्सिक विभागाची टीम,श्वान पथक,
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासाच्या दृष्टीने आवश्यक ते पुरावे गोळा केले आहेत.
या चोरीची फिर्याद रमेश मधुकर सावंत यांनी दिली असून गुन्ह्याची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पाली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे हे करीत आहेत.
मुंबई गोवा महामार्गावरील पाली बाजारपेठच्या लगत असणार्या मराठवाडी या नागरी वस्तीत दिवसा झालेल्या या धाडसी चोरीने संपूर्ण पाली विभागात खळबळ उडाली आहे . त्यामुळे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.









