रत्नागिरी:- मुंबईहून आरडीचे पैसे काढण्यासाठी आलेल्या पतीने पत्नीला मारहाण केली. झटापटीमध्ये पत्नीच्या मानेला कोयती लागून दुखापत झाली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल दत्ताराम माईन (रा. पाली-माईनवाडी, रत्नागिरी. सध्या: रामगड गोशाळा रोड, मुलुंड-मुंबई) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २८) सायंकाळी सहाच्या सुमारास पाली-माईनवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला या पती व मुलांसह मुंबईहून पाली येथे आरडीचे पैसे काढण्यासाठी आल्या होता. त्यांना परत सायंकाळी मुंबईत जायचे होते. त्या घरातील सामानाची आवराआवर करुन पतीची वाट पहात होत्या. त्यावेळी सायंकाळी सहा वाजता पती मद्याच्या नशेत घरी आला. त्या मुलांना बडबडत होत्या. त्यांनी पतीलाही सांगितले की आपणास मुंबईला जायचे आहे. लवकर निघा असे बोलल्याचा राग मनात धरुन पतीने पत्नीला शिवीगाळ करुन हाताच्या थापटाने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. या झटापटीत पतीने हातात घेतलेली कोयती महिलेच्या मानेच्या उजव्या बाजूस लागून किरकोळ दुखापत झाली. हा प्रकार पाहून तीचे चुलते सासरे व चुलत सासू यांनी दोघांची झटापट सोडविली व पतीच्या हातातील कोयती काढून घेतली म्हणून पतीने त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तक्रारदार महिलेने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.