लांजा:- शिमगा उत्सवातील पालखी नाचविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांना बांबूच्या काठीने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील वेरवली खुर्द येथे घडली. सोमवारी १३ मार्च रोजी सायंकाळी ७.४५ वाजता ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून दोन्ही गटातील एकूण नऊ जणांविरोधात लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिमगा उत्सवातील पालखी नाचविण्याच्या कारणावरून हा वाद झाला आहे. यातील दोन्ही गट हे एकाच वाडीतील रहिवाशी आहेत. यामध्ये संतोष सिताराम राणे ( ५५ वर्षे, रा. वेरवली खुर्द, राणेवाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या फिर्यादीनुसार, शैलेश श्रीधर राणे याने एकनाथ राणे यांना पालखी नाचविण्यासाठी विरोध केला तेव्हा त्यांच्यात झटापट होवून शैलेश राणे यांनी त्याच्या हाताच्या थापटाने मारहाण केली होती. हा वाद ग्रामस्थांनी मिटविला होता. त्यानंतर संतोष राणे व साक्षीदार एकनाथ राणे, महेश राणे असे चालत घरी जात असताना मारुती मंदिराजवळ शैलेश राणे यांनी गैरकायदा जमाव करून हातात बांबूच्या काठ्या घेवून त्यांना मारहाण करून एकेकाला मारून टाकतो असे बोलून आपल्या हातातील बांबूच्या काठीने डोक्यात आणि कपाळावर दुखापत केली. याप्रकरणी संतोष राणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी शैलेश श्रीधर राणे, भगवान श्रीधर राणे, सौ.भाग्यश्री भगवान राणे, सौ. सुगंधा श्रीधर राणे आणि चिराग भगवान राणे (सर्व रा. वेरवली खुर्द राणेवाडी) यांच्या विरोधात भा.द.वि. कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसऱ्या गटातील शैलेश श्रीधर राणे (४० वर्षे, वेरवली खुर्द, राणेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आपण व त्यांचा पुतण्या रोशन भगवान राणे असे घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा एकनाथ राणे यांनी त्यांना बोलून तू मोठा गावकर झाला आहेस काय असे बोलून गालावर मारले. त्यानंतर महेश व प्रमोद राणे यांनी येवून झटापट करून शिवीगाळ केली तसेच महेश राणे याने त्याच्या हातातील काठी फिर्यादी शैलेश राणे यांच्या डोक्यात व डाव्या त्याच्या खांद्यावर मारून दुखापत केली. यावेळी फिर्यादींचा पुतण्या रोशन राणे याला देखील मारहाण व दमदाटी केली. याप्रकरणी शैलेश राणे यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी एकनाथ गुणाजी राणे, महेश मनोहर राणे, संतोष सिताराम राणे, प्रमोद विष्णू राणे (सर्व रा. वेरवली खुर्द, राणेवाडी) या चौघांवर भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूगडे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टे. प्रमिला प्रकाश गुरव या करत आहेत.









