दापोलीतील साई रिसॉर्टच्या चौकशीचे आदेश
रत्नागिरी:- साई रिसोर्टच्या (ता. दापोली) अनधिकृत बांधकामाबाबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केल्या तक्रारीवरून वस्तुस्थिती काय याची खातरजमा करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, दापोली प्रांताधिकारी हे याबाबत चाैकशी अधिकारी असून त्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री अॅड. अनिल परब याचे हे
रिसाॅर्ट असल्याचा आराेप आहे. मुरुड (ता. दापोली) येथील साई रिसोर्टबाबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लेखी तक्रार जिल्हाधिका-यांकडे केली आहे. मुरुड तालुका दापोली येथील गट क्रमांक 446 येथील साई रिसॉर्ट एनेक्सचे बांधकाम बेकायदेशीर आहे, सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले आहे, फसवणूक, दस्तावेजात खाडाखोड, परिवहन मंत्री अनिल परब यांनी पदाचा दुरुपयोग केला तसेच अधिकार्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले,असे मुद्दे साेमय्या यांनी मांडले आहेत.
याबाबतची लेखी तक्रार रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मुरुड (ता. दापोली) येथे साई रिसॉर्टचे बांधकाम बिनशेती परवानगी, रस्ता, घरपट्टी आदीबाबत नियमांचे उल्लंघन करून केलेले आहे का याबाबतची वस्तूस्थिती तपासण्यास सांगण्यात आले आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी व उपविभागीय अधिकारी दापोली यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमले आहे. चौकशी समितीने अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवायचा आहे. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी तसे पत्र दिले आहे.