पायवाटेच्या वादातून भावाला बांबूने मारहाण

लांजा:- मोठ्या भावाला शिवीगाळ आणि बांबूने मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील भांबेड गोसावीवाडी येथे सोमवारी (ता. १४) सायंकाळी घडली. या प्रकरणी भाऊ आणि वहिनी अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांबेड- गोसावीवाडी येथील विष्णू नारायण गोसावी (वय ८०) यांनी त्यांच्या सामायिक घराच्या समोरून जाणाऱ्या पायवाटेवर त्यांचा भाऊ विश्वनाथ नारायण गोसावी याने बेडे टाकले होते. हे बेडे विष्णू गोसावी यांनी काढून टाकले. याचा राग मनात धरून विश्वनाथ गोसावी (६५) आणि त्याची पत्नी वनिता गोसावी (६०) या दोघांनी मिळून मोठा भाऊ विष्णू नारायण गोसावी याला शिवीगाळ करून डोक्यात बांबूने मारहाण केली. रविवारी सायंकाळी सात वाजता घडलेल्या घटनेप्रकरणी गोसावी यांचा भाऊ तुळशीराम नारायण गोसावी (६२) यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी विश्वनाथ गोसावी आणि वनिता गोसावी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.