संगमेश्वर:- मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी येथे कंटेनरने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता. कंटेनरचालकावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा निकाल लागला असून, न्यायालयाने २० हजार रुपये दंड व तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
राजू मोहन दास (रा. गोवा) हा कंटेनर घेऊन १२ फेब्रुवारी २०२१ रोजी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. कंटेनर धामणी येथे आला असता पादचारी श्रीराम तुकाराम वनकर यांना कंटेनरची धडक बसली. या अपघातात वनकर यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद पोलिसपाटील अनंत पाध्ये यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात दिली होती. यानुसार कंटेनरचालक राजू दास याच्याविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा निकाल नुकताच लागला असून, दास याला न्यायाधीश श्रुती पाटील यांनी तीन आणि ६ महिने सश्रम कारावास आणि १० हजार आणि ५ हजार दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. सर्व शिक्षा या एकत्रित भोगावयाच्या आहेत. २० हजार रुपयांचा दंड मृत वनकर यांच्या पत्नीस द्यावयाचा आहे. सरकारी वकील अमृता गुरूपादगोळ, पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस निरीक्षक उदय झावरे, उपनिरीक्षक चंदू कांबळे, एस. एस. कामेरकर यांनी काम पाहिले.