पाटगाव येथे मटका खेळणाऱ्यावर कारवाई

संगमेश्वर:- तालुक्यातील पाटगाव येथे ‘कल्याण मटका’ अवैध जुगार खेळवणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली असून, आरोपीकडून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार सत्यजित शिवाजी दरेकर (वय ३९) यांनी याबाबत देवरूख पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार, २६/०९/२०२५ रोजी सायंकाळी १७.५५ वाजता (५ वाजून ५५ मिनिटांनी) देवरुख पाटगांव, गोपाळवाडी येथील एका शेडच्या बाजूला हा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून एकनाथ बाळु कुंभार (वय ४१, रा. चिखली, रांधव, ता. संगमेश्वर) या आरोपीला अटक केली. आरोपी एकनाथ कुंभार हा कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना, गैरकायदा पद्धतीने आपल्या ताब्यात मटका जुगाराची साधने आणि रोख रक्कम बाळगून ‘कल्याण मटका’ नावाचा जुगाराचा खेळ खेळवीत असताना आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी ₹१२८०/- रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरले जाणारे इतर साहित्य असा एकूण ₹१२८५/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. देवरूख पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.