पाच रुपयांच्या नावाखाली तब्बल एक लाखाचा ऑनलाईन गंडा 

रत्नागिरी:- रिटर्न गेलेले कुरियर थांबवण्यासाठी प्रौढाला लिंक पाठवून अज्ञाताने तब्बल 1 लाख रुपयांचा चुना लावला. ही घटना शनिवार 31 डिसेंबर रोजी दुपारी 2.52 वा. उमरे येथे घडली.

याबाबत अनिल हरी सनगरे (40,रा.मूळ रा.विरार सध्या रा.उमरे, रत्नागिरी ) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,अनिल सनगरे मीरा भाईंदर येथील एका कंपनीत नोकरीला आहेत.त्यांच्या कंपनीचे मारुती कुरियरमध्ये आलेले कुरियर ते उमरे येथील कार्यालयात हजर नसल्याने माघारी गेले होते. त्यामुळे सनगरे यांनी गुगल सर्च करून मारुती कुरियरचा नंबर मिळवून त्यावर फोन केला. तेव्हा हिंदी बोलणाऱ्या त्या अज्ञाताने तुमचे कुरियर थांबवायचे असेल तर मला 5 रुपये टाका असे सांगितले. सनगरे यांनी पैसे पाठवले परंतु ते फेल गेल्याने अज्ञाताने सनगरेना एक लिंक पाठवली. ती सनगरे यांनी स्वीकारली असता त्यांच्या बँक खात्यातून आधी 90 हजार आणि नंतर 9 हजार असे एकूण 99 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने आपल्या खात्यात जमा करून घेतले. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.