पाचल येथे चायनिज सेंटरमध्ये हाणामारी; पाच जणांविरुद्ध गुन्हा

पाचल:- राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठेतील ‘मैत्री चायनिज सेंटर’ येथे बिलाच्या कारणावरून वाद होऊन बेकायदेशीर जमाव करून दंगा घालणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या पाच आरोपींविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुबारक इमाम फरास (वय ३४, रा. पाचल, मुस्लीमवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९(२), १९१(२), ११५(२), ३५२, ३५१(२), १३१ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही घटना दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास पाचल बाजारपेठेतील ‘मैत्री चायनिज सेंटर’ येथे घडली.फिर्यादी मुबारक फरास हे कॅश काउंटरवर बसलेले असताना, श्रवण संतोष तेलंग, महेश चंद्रकांत सुतार, सयेश एकनाथ सुतार, सुरज राजेंद्र गुरव आणि अमोल गोविंद गुरव हे मद्यपान करून आले होते। त्यांनी चायनिजचे बिल एवढे कसे झाले, अशी विचारणा करून वाद घालण्यास सुरुवात केली.
या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.आरोपी श्रवण तेलंग (वय २१, रा. पाचल, पेठवाडी), महेश सुतार (वय ३५, रा. मुर सुतारवाडी), सयेश सुतार (वय २७, रा. मुर सुतारवाडी), सुरज गुरव (वय २५, रा. तळवडे गुरववाडी) आणि अमोल गुरव (वय २५, रा. तळवडे गुरववाडी) या पाच जणांनी बेकायदेशीर जमाव करून दंगा घातला. त्यांनी फिर्यादी मुबारक फरास तसेच साक्षीदार लियाकत इमाम फरास यांच्या अंगावर धावत जाऊन शिवीगाळ केली.तसेच, “तुम्हाला घरात घुसून ठार मारून टाकतो” अशी धमकी देत त्यांना हाताच्या थापटाने मारहाण केली. सध्या घटनास्थळी शांतता आहे.आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याबाबत पुढील तपास रायपाटण पोलीस दूरक्षेत्रचे कमलाकर पाटील करीत आहे.