राष्ट्रीय महामार्गालगतची अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या ना. सामंत यांच्या सूचना
रत्नागिरी:- शहराजवळील साळवी स्टॉप ते टीआरपी परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या मध्ये रिकाम्या जागांवर अनधिकृत बांधकामांचे पेवच आले आहे. उटसुठ कोणही रातोरात पक्की मात्र अनधिकृत बांधकामे उभा करत आहेत. याची गंभीर दखल राष्ट्रीय महामार्ग विभागानंतर उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. पाचपट मोबदला मिळविण्याच्या उद्देशाने ही बांधकामे केली आहेत. त्यामुळे महामार्ग विभाग आणि प्रांताधिकार्यांना सांगुन ती तत्काळ हटविण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषद बोलत होते. रत्नागिरी शहरामध्ये असलेल्या मिर्या-नागपूूर रस्त्यामध्ये येणार्या साळवी स्टॉप भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. एक-एक म्हणता पक्की मोठी शेड एका रांगेत उभारली आहेत. हे सर्व कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे, हा प्रश्न अजून सुटलेला नाही. ही अनधिकृत बांधकामं सुरूच आहेत. पालिकेने याबाबत हात वर केला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे हे काम असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत महामार्ग विभागाने सुमारे 100 जणांना नोटीसा बजावल्या आहे.
दरम्यान साळवी स्टॉप ते टीआरपी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत. रातोरात ही बांधकामे उभा केली जात आहेत. काही लोकप्रतिनिधींचा यामध्ये समावेश आहे. याबाबत आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, राष्ट्रीय महामार्गामध्ये आपले पक्के शेड गेल्याचे दाखवून पाचपट भरपाई मिळविण्याचा हा अनेकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे याभागात हे अनधिकृत बांधकामेच पेव आले आहे. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि प्रांताधिकार्यांना सूचना केल्या आहेत. लकरच या मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात येतील.