माईकमधून वाऱ्याचा आवाज ; आसनेही अडचणीची
रत्नागिरी:- वि. दा. सावरकर नाट्यगृह हे राज्यातले उत्कृष्ट नाट्यगृह व्हावे, यासाठी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शर्थीचे प्रयत्न केले. दहा कोटीचा निधी त्यांनी मंजूर करून दिला. अवघ्या ६८ दिवसांमध्ये नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले. मात्र सागरा प्राण तळमळला, या नाटकाच्या पहिलाच प्रयोग झाला आणि अत्याधुनिक यंत्रणेच्या अनेक समस्या प्रकर्षाने पुढे आल्या.
नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणेचा ब्लोअर रंगमंचावरील माईकवर असल्याने आवाजाचा प्रश्न निर्माण होतो. अपेक्षित कुलिंग होत नाही. आसनव्यवस्था एवढी जवळ आहे की, खुर्ची आरामदायी केली तर पाठच्या खुर्चीवर बसणाऱ्याच्या गुडघ्याला लागते. टाकलेले मॅट कमी दर्जाचे आणि आकर्षक नाही तक्रारी येऊ लागल्या आहेत. एवढा निधी खर्च करूनही त्या दर्जाची यंत्रणा उभारली आहे का, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. हा निधी पाण्यात जाऊ नये, एवढीच अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.
दुरुस्ती केलेल्या नाट्यगृहाचा २७ जानेवारीला लोकार्पण सोहळा करण्यात आला. दुसऱ्या दिवशीच सागरा प्राण तळमळला या नाटकाचा प्रयोग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला. सुमारे २५ लाख रुपये खर्च करून बसविण्यात आलेली साऊंड सिस्टीम कुचकामी ठरली. बराच वेळ स्टेजवरील पात्रांचा, माईकचा आवाज येत नव्हता. जेव्हा आवाज यायला लागला तर त्याला कसलाही दर्जा नव्हता. वाऱ्याचाच आवाज माईकमधून येत होता. बेस खाली ठेवल्याने त्याचा इफेक्ट जाणवत नाही, अशा तक्रारी आल्या. सुमारे २ कोटी ७५ लाख रुपये वातानुकूलित यंत्रणेवर खर्च करूनही अपेक्षित कुलिंग होत नसल्याची तक्रार आहे. बाहेरून खुर्च्या मागविण्यात आल्या आहेत. एक खुर्ची सुमारे आठ हजाराची आहे. अशा ९३० खुर्चांसाठी ८३ लाख रुपये खर्च केले. परंतु त्या खुर्चांच्या दर्जाबाबत आक्षेप आहे. खुर्च्यातून एखाद्याला रांगेत आत यायचे किंवा बाहेर जायचे असेल तर ते शक्य नाही. अशा समस्या उघड झाल्याने कोण आर्किटेक होते, असा सवाल केला जात आहे.
ब्लोअरच्या हवेचा माईकमधून आवाज येतो ही तांत्रिक चुक लक्षात आल्यानंतर आम्ही ब्लोअरचा स्पीड कमी करण्यासाठी व्हीएफडी यंत्रणा बसविण्याचे काम सुरू केले आहे. आता ब्लोअरच्या हवेचा परिणाम होणार नाही.
-एकनाथ बाईत, एसीचे काम करणारी एजन्सी (मुंबई)
साऊंड सिस्टीम थेट कार्यक्रमावेळी सुरू करण्यात आली. त्यामुळे त्याचे सेटिंग करता आलेले नाही. लवकरच इफेक्टीव्ह साऊंड मिळण्यासाठी त्याचे सेटिंग करण्यात येईल.
–सतीश रेडकर, साऊंड यंत्रणा