पर्स लांबवणाऱ्या चोरट्याला पोलिस कोठडी

रत्नागिरी:-  रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची पर्स लांबवून सुमारे ३ लाख ३५ हजार १०७ रुपयांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या संशयित तरुणाला न्यायालयाने गुरुवारी १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.    

चोरीची ही घटना १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.४५ ते ५ वा. कालावधीत रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान घडली होती. दत्तात्रय शिवाजी गोडसे (२०, मूळ रा. सोलापूर, सध्या रा. वाशी मुंबई) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे . याबाबत विजय श्रीधर नाईक (५८, रा. बोरीवली, मुंबई) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार, १३ नोव्हेंबर रोजी ते पत्नीसह गांधीधाम ते नागरकोईल रेल्वेने वसई ते सावंतवाडी असा प्रवास करत होते. रेल्वे रत्नागिरी स्टेशनला थांबून सावंतवाडीला जाण्यासाठी निघाली असताना अज्ञाताने त्यांच्या झोपलेल्या पत्नीच्या बाजूची पर्स लांबवली होती. पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, कुडी, माळ, अंगठी, चेन व रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल होता. दरम्यान ११ डिसेंबर रोजी राजधानी एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाचा मोबाईल चोरताना रेल्वेतील इतर प्रवाशांनी त्याला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. रेल्वे पोलिसांनी त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर शहर पोलिसांनी संशयित म्हणून दत्तात्रय गोडसेला गुरुवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याची रवानगी १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत केली.