पर्यटनस्थळात समाविष्ट भाट्ये किनाऱ्याला सुशोभीकरणाची प्रतीक्षा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरालगतच्या भाट्ये समुद्रकिनार्‍याचा पर्यटनस्थळात समावेश झाला आहे. रोजच्या रोज या समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांची रेलचेल वाढत आहे. त्यामुळे आता या समुद्रकिनार्‍याच्या सुशोभिकरणाची प्रतिक्षा आहे.

पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या शहरांमधील आणि ग्रामीण भागातील अनेक प्रसिद्ध यात्रास्थळे, ऐतिहासिक, सांस्कृतिक, निसर्गरम्य सागरी किनारे पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात जोमाने प्रयत्न सुरु झाले. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी शहरालगतच्या भाट्ये समुद्रकिनार्‍याचा समावेश झाला आहे.

भाट्ये समुद्रकिनारा ‘क’ वर्गातील पर्यटनस्थळ असून या पर्यटनस्थळाचा विकास करण्याची गरज निर्माण झाली आहे. या भाट्ये समुद्रकिनारी दररोज पर्यटकांची मोठी गर्दी असते परंतु तेथे पर्यटकांना अपेक्षित सुविधा नाहीत. त्या सुविधा पुरवण्याची गरज निर्माण झाली असून या समुद्रकिनार्‍याच्या सुशोभिकरणाची मागणीसुद्धा वाढू लागली आहे.
भाट्ये समुद्रकिनारी सर्वात महत्वाची गरज म्हणजे येथे वाहनांच्या पार्किंगची गैरसोय होते. लहान मुलांना येथे खेळाचे मैदान किंवा खेळघर आवश्यक आहे. येथील सध्याचे स्टॉल अस्थाव्यस्त असून पर्यटकांना आवश्यक असणार्‍या वस्तू पुरवणार्‍या शॉपिंग सेंटरची गरज
आहे.

त्याचबरोबर अनेक पर्यटक समुद्रातील पाण्यात बागडत असतात. खार्‍या पाण्यातून बाहेर आल्यानंतर त्यांना स्वच्छ होण्यासाठी गोड्या पाण्याचे तलाव किंवा स्नानगृहाची आवश्यकता आहे. या सुविधांच्यादृष्टीने अंदाजपत्रक बनवून किनार्‍याचे सुशोभिकरण लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.