परिचरिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी पोलिसांना यश; तीन दिवसांत आरोपी जेरबंद 

चिपळूण:- चिपळूण शहरातील गजबजलेल्या परिसरात २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेला नराधम अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. तपासातून खात्री पटल्यावर पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी आरोपीला बेडया ठोकल्या आहेत.  

चार दिवसांपूर्वी चिपळूण शहरातील भोगाळे परिसरात एका २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अत्याचार करणारा नराधम पसार झाला होता. पोलिसांनी संबंधित नराधमाचा शोध घेण्यासाठी दोन पथकांच्या माध्यमातून मोहीम राबवली. यामध्ये पोलिसांना मध्यवर्ती बसस्थानक व भोगाळे येथील दीपक लॉज समोरील सीसीटीव्ही फुटेज हाती लागले होते.

पीडित तरुणीने वर्णन केल्याप्रमाणे एक तरुण त्यामध्ये कैद झाला होता. त्यामुळे संबंधित तरूणाच्या हालचाली व चालण्याच्या पद्धतीवरून पोलीस त्याचा शोध घेत होते. अशा पद्धतीने तपास केल्यानंतर संशयित आरोपी तोच असल्याची पोलिसांची खात्री पटली. अखेर रविवारी रात्री त्या आरोपीला अटक केली. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी बजावली.