रत्नागिरी:- परदेशात फिरवून आणतो सांगून रत्नागिरीतील एकाला 1 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. डी़ एस. चंद्रशेखर (रा़ शिवाजीनगर, रत्नागिरी) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे़. याप्रकरणी चंद्रशेखर यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे़. त्यानुसार शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शहरानजीकच्या भाट्ये येथील कोहिनूर बीच रिसॉर्ट येथे वॉस्कॉन रिअर इस्टेट अॅण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट प्राव्हेट लिमिटेड यांच्यावतीने 28 मे 2022 रोजी सेमिनार घेण्यात आले होते़. यावेळी प्रशांत (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर 10 ते 12 जणांनी परदेशात 6 रात्री व 7 दिवसाच्या स्किमबाबत उपस्थितांना माहिती दिली. या स्किमचा लाभ घेण्यासाठी 1 लाख रूपयांची मेंबरशिप घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रशांत व त्यांच्या सहकार्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चंद्रशेखर यांनी 1 लाखांचा भरणा करून मेंबरशीप घेतली. मात्र चंद्रशेखर यांनी याविषयी फोन केला असता संपर्क होवू शकला नाही़. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चंद्रशेखर यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.