रत्नागिरी:- रत्नागिरीत बुधवारी दुपारनंतर अचानक परतीचा पाऊस दाखल झाला. विजांच्या लखलखाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.
दीपावली सणासाठी रत्नागिरी बाजारपेठ अक्षरश सजली होती. आकर्षक कंदील, रांगोळी, पणत्या आणि इतर वस्तू विकण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुकाने सजवली असताना अचानक आलेल्या परतीच्या पावसाने व्यापाऱ्यांचे नुकसान केले आहे. अनेक दुकानांमधील कागदी कंदील भिजून गेले तर काही ठिकाणी रांगोळीचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे वस्तु सुरक्षित ठिकाणी ठेवताना व्यापाऱ्यांची अक्षरशः तारांबळ उडाली होती. परतीच्या पावसात व्यापाऱ्यांचे नुकसान तर झालेच मात्र ग्राहकांच्या दिवाळी खरेदीच्या आनंदावर देखील विरजण पडले.