२ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- रत्नागिरी पोलिसांनी अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. सोमवार २ जून रोजी परटवणे तिठा येथे रिक्षातून मद्याची अवैध वाहतूक करण्यात येत होती. याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवैध मद्यासह दोन लाख ३७ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवैध मद्य वाहतूक गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 जून रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली. रत्नागिरी शहरात गस्त करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमी मिळाली. माहिती मिळताच परटवणे ते साळवी स्टॉप जाणाऱ्या मार्गाने काही लोक रिक्षा मधून दारू वाहतूक करीत आहेत.
मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने परटवणे तिठा येथे दोन पंचांसमवेत वॉच करीत असता एक रिक्षा, पुठ्ठ्याचे बॉक्स भरून घेऊन येत असताना दिसली. सदर रिक्षा चालकास थांबवून रिक्षा मधील बॉक्सची खात्री केले असता बॉक्समध्ये मद्याच्या बाटल्या असल्याचे दिसून आले. या इसमास नाव-गाव विचारतात त्याने आपले नाव अनिल विष्णू वालकर (वय 38 रा. मांडवी रत्नागिरी) असे असल्याचे सांगीतले.
आरोपी अनिल विष्णू वालकर चालवत असलेल्या रिक्षा मधून वेगवेगळ्या कंपनीची देशी विदेशी असे एकूण 87,120 किमतीची मद्य तसेच 1,50,000 किमतीची रिक्षा असा एकूण 2,37,120 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे व आरोपीस ताब्यात घेण्यात आले. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई करता, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेला आहे.









