रत्नागिरी:- राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिशे हत्याकांडातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला जिल्हा न्यायालयाने वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी रत्नागिरीतील खाजगी रुग्णालयात नेण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे आरोपीच्या आरोग्याच्या अधिकाराला कायदेशीर संरक्षण मिळाले असले, तरी तपास यंत्रणेने उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे जिल्हाभर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आंबेरकर याने किडनी, पित्ताशय, प्रोस्टेट आणि मूळव्याधीसह विविध आरोग्य समस्यांचा दाखला देत न्यायालयात अर्ज केला होता. छातीत वेदना, चक्कर येणे आणि पोटदुखीचा त्रास होत असल्याचे सांगत त्याने तातडीच्या उपचारांची मागणी केली होती.
या अर्जावर सुनावणी करताना तपास अधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. “खासगी रुग्णालयात पाठविण्यापूर्वी शासकीय रुग्णालयातील सुविधांचा विचार व्हावा. जिल्हा शल्य चिकित्सकांचे मत घेऊन तिथे उपचार शक्य आहेत का, याची खातरजमा करावी,” अशी भूमिका सरकारी पक्षाने मांडली होती. तसेच आरोपीने आवश्यक वैद्यकीय कागदपत्रेही सादर केली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, आरोपीच्या आरोग्याच्या तक्रारींचे गांभीर्य विचारात घेऊन न्यायालयाने त्याला रामनाथ रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यास परवानगी दिली. त्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्याचे आदेश शहर पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र, आदेशात “गंभीर आरोग्य समस्या जाणवल्यास” असे नमूद केले असले तरी, अशा परिस्थितीचे मूल्यांकन कोण करणार आणि उपचारांची व्याप्ती काय असेल, यावर स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांचा अभाव असल्याने नवीन कायदेशीर चर्चेला तोंड फुटले आहे.
याआधी जानेवारी २०२६ मध्ये आंबेरकर याला वैद्यकीय कारणास्तव सहा आठवड्यांचा अल्पकालीन जामीन मंजूर झाला होता. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा आधार घेत त्याने १३ जानेवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीत बाहेर राहून उपचार घेतले होते.









