खेड:-चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्या प्रकरणी येथील न्यायालयाने पतीला जनमठेपेची शिक्षा सुनावली आहे. खेड तालुक्यातील निळीक येथे १६ जून २०१५ रोजी ही घटना घडली.
आरोपी प्रदीप काशीराम खोचरे ( ४५, रा.निळीक, ता. खेड, जि.रत्नागिरी) हा आपल्या पत्नी सुवर्णा प्रदिप खोचरे हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. याच संशयातून 16 जून 2015 रोजी पत्नी सकाळी प्रात:विधी करीता गेली असता, तिचे मागावर जाउन काठीने व दगडाने ठेचून निर्घृण खून केला. पोलिसांनी प्रदीप खोचरे याच्यावर भा.द.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू होती. सरकार पक्षातर्फे १७ साक्षीदार तपासण्यात आले.
सरकारी वकील सौ. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजुने युक्तीवाद करुन संपुर्ण केसचे कामकाज पाहिले. ऍड सौ जाडकर यांचा युक्तीवाद व परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून येथील अतिरिक्त सत्र न्यायालय १ चे न्यायाधीश श्री ए.एस.आवटे यांनी खोचरे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या घटनेचा तपास अंमलदार श्री.पोलीस निरिक्षक श्री अशोक जांभळे, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती. निशा जाधव यांनी केला. तसेच कोर्ट पैरवी श्री. अजय इदाते आणि श्री. मर्चडे यांनी या कामी सहकार्य केले.