दापोली;- माझ्यासोबत राहत नाहीस, तेव्हा माझ्या घरात येवून वाद करु नकोस असे सांगितल्याचा राग येवून पत्नीने पतीला व 80 वर्षीय सासूला मारहाण केल्याची घटना दापोली तालुक्यातील चिंचाळी रोहिदासवाडी येथे घडली. याबाबतची फिर्याद गजानन गोविंद जालगावकर (43, दापोली) यांनी येथील पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाड येथून रेश्मा गजानन जालगावकर (पत्नी), सोनाली गजानन जालगावकर, कोमल गजानन जालगावकर, करण गजानन जालगावकर (सर्व महाड, रायगड) हे फिर्यादी गजानन जालगावकर यांच्या दापोली येथील घरामध्ये राहण्यासाठी आले. यावेळी फिर्यादी गजानन यांनी ‘तू माझ्या सोबत राहत नाही, तेव्हा माझ्या घरात येवून वाद करु नकोस, तुला घरात यायचे अथवा माझे सोबत संसार करायचा असेल तर आपले समाजातील चार लोक जमवून चर्चा व त्यानंतर घरात ये‘ असे सांगितले. याचा राग आल्याने पत्नी रेश्मा जालगावकर तसेच सोनाली, कोमल, करण जालगावकर यांनी काठीने डोक्यात, कपाळावर, अंगावर ठिकठिकाणी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. हे भांडण सोडवण्यासाठी गजानन यांची आई गेली असता तिचीही मान दाखून खाली पाडले व हातातील दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत गजानन जालगावकर (43), द्रौपती गोविंद जालगावर (80, रोहिदासवाडी, दापोली) हे जखमी झाले आहेत.
याबाबतची फिर्याद गजानन जालगावकर यांनी दाखल केल्यानंतर पोलिसांनी रेश्मा, सोनाली, कोमल, करण जालगावर या चार जणांवर भादविकलम 324, 352, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक पोलीस करत आहेत.