पती जेलमध्ये असल्याने तणावातून महिलेची आत्महत्या

पाथर्डे येथील आंबा बागेत घेतला गळफास

राजापूर:- राजापूर तालुक्यातील पाथर्डे येथे एका ३० वर्षीय विवाहितेने आंबा बागेतील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. पती कारागृहात असल्याने असलेल्या मानसिक तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

​राधिका रमेश परिहार (वय ३०, मूळ रा. घोडागुडी, जि. कैलाली, नेपाळ; सध्या रा. पाथर्डे, राजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. राधिका यांचे पती रमेश परिहार हे सध्या रत्नागिरी येथील कारागृहात (जेलमध्ये) आहेत. पती जेलमध्ये असल्याने राधिका गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या. याच नैराश्यातून ३ मार्च रोजी दुपारी १ वाजेपूर्वी, त्यांनी पाथर्डे येथील सौरभ जाधव यांच्या आंबा बागेत जाऊन आंब्याच्या झाडाला ओढणीने गळफास लावून घेतला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

​या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ३ मार्च रोजी रात्री ८ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.