पतीने गळा दाबून केला पत्नीचा खून

राजापूर:- सतत शिवीगाळ करणे, नाहक त्रास देणे या कारणाला कंटाळून पतीनेच आपल्या पत्नीचे नाक व तोंड दाबून खुन केल्याची घटना तालुक्यातील परुळे-सुतारवाडी येथे घडली आहे.  शुक्रवारी 25 जून रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना आहे. सौ. सिध्दी उर्फ विद्या गजानन भोवड (35) असे यातील मयत महिलेचे नाव आहे. तशी माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी पती गजानन जगन्नाथ भोवड (40) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीच्या बहिणीला भेटण्यासाठी जात असताना वाटेतील जंगलात पत्नी बेसावध असताना पाठीमागून तिला धरून तिचा नाक व गळा दाबून गजानन याने तिचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र या खुनामागे काही वेगळे कारण आहे काय याचाही शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, पत्नीच्या हत्येनंतर तिचा पती गजानन जगन्नाथ भोवड याने  बनाव करताना अज्ञात व्यक्तीने आपल्या पत्नीला ओढीत नेले व तिचा खून केल्याचे भासवित पोलिसांनाही गुंगारा देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चाणाक्ष पोलीसांनी तो हाणुन पाडला. गजानन यास पोलीसी खाक्या दाखवितानच पत्नी सिध्दी हीचा खून आपणच केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.

याप्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राजापुर तालुक्यातील परुळे येथील सुतारवाडीत भोवड कुटुंबिय सामायिक घरात रहातात. त्यामध्ये एका भागात आरोपी गजानन तर दुसर्‍या भागात आरोपीचे
आई-वडील व भाऊ आणि तिसर्‍या भागात आरोपीच्या चुलतीचे कुटुंब रहाते. आरोपीचा भाऊ कळवा ठाणे येथे रहात असतो. आरोपी गजानन हा त्याची पत्नी सिध्दी उर्फ विद्या व आठ वर्षीय मुलगा यांच्या समवेत कळवा (ठाणे) येथे रहात होता. तो परळ येथे एका प्रिंटींग प्रेसमध्ये लॅमिनेशन ऑपरेटर म्हणून कामाला होता. एप्रिल मध्ये लागलेल्या लॉकडाऊनमध्ये गजाननची नोकरी गेल्यानंतर तो पत्नी व मुलासह 29 मे 2021 रोजी आपल्या परुळे गावी रहाण्यासाठी आला होता. त्यानंतर तो कुटुंबासह गावीच रहात होता.

गजानन याची पत्नी सौ. सिध्दी उर्फ विद्या हिची बहिण परुळे येथे रहात असून काही दिवसांपूर्वी तिच्या बहिणीचे मुल पोटातच दगावले होते, बहिणीला बघण्यासाठी सौ. सिध्दी ही दोन वेळा तिच्या घरी गेली होती. शुक्रवारी दुपारी हे दोघे पती-पत्नी पुन्हा सिध्दीच्या बहिणीला भेटण्यासाठी निघाले होते. वाटेत असलेला वहाळ पार करुन दोघे बाजुला असलेल्या अज्ञात जंगलातून चालले असता पती गजाननने अचानक सिध्दीचे नाक व तोंड दाबून धरले त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला होता. तशी कबुली गजानन याने पोलिसांना दिली आहे.

पत्नी सिध्दी मृत झाल्याचे लक्षात येताच गजानन घरी आला व आजुबाजुच्या मंडळींशी बोलताना त्याने बनाव केला की, आपण पत्नी सिध्दीसमवेत चाललो असता समोरुन एक पाढर्‍या चेहर्‍याचा राकट व विचित्र चेहरा असलेली एक व्यक्ती आली त्या व्यक्तीने मला ढकलून दिले व पत्नीला उचलून तो जंगलात निघून गेला, तेव्हा आपली शुध्द हरपली होती. मात्र त्यातुन सावरल्यावर आपण घरी आलो असे सांगितले. मात्र त्यानंतर तेथे उपस्थीत असलेले अनेक ग्रामस्थ सौ. सिध्दी हिचा शोध घेत जंगलच्या दिशेने निघाले. परुळे तट असे त्या परिसराची ओळख असून तेथे आजुबाजुला शोध घेतला असता सिध्दी मृतावस्थेत आढळून आली. त्या घटनेची खबर परुळे गावचे पोलीस पाटील विलास कस्पले यांना देण्यात आली. मात्र ते होम आयसोलेटेड असल्याने त्यांनी रायपाटण दुरक्षेत्रातील पोलिसांना झाल्या प्रकाराची माहिती दिली .

पत्नी सिध्दीच्या खुनानंतर तिच्या अपहरणाचा बनाव रचलेल्या पती गजाननने पोलिसांना देखील कुणी अज्ञात व्यक्तीने आपल्या पत्नीला ओढत नेले व नंतर ती मृतावस्थेत आढळल्याची खोटी माहिती सांगत तशी तक्रारही पोलिसांत नोंदविली होती .
याबाबत माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जनार्दन परबकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे,पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बसवंत, हेडकाँस्टेबल प्रमोद वाघाटे, कमलाकर तळेकर महिला कर्मचारी नामये, कोळी, होमगार्ड शिंदे, पोलीस वाहन चालक वाडकर, बाणे आदी घटनास्थळी दाखल झाले. तर उपविभागीय पोलीस अधिकारी कानडे हे देखील तातडीने परुळे येथे दाखल झाले. यानंतर पंचनामा करण्यात आला. मयत सिध्दीचा हिचा मृतदेह रायपाटण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. त्याचबरोबर शुक्रवारी रात्री अकरा वाजल्यापासून मयत सिध्दीचा पती गजानन याची पोलीस कसून चौकशी करीत होते पण तो पोलिसांना तपासात गुंगारा देत होता. कुणा अज्ञात व्यक्तीने तिला ओढत नेले व नंतर ती मृतावस्थेत सापडली असेच तो वारंवार सांगत होता. अखेर पोलीसांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करताच व पोलिसी खाक्या दाखविताच पोलिसांच्या तपासात पूर्णपणे फसलेल्या गजाननने अखेर शरणागती पत्करली आणि पत्नी सिध्दीचा खून आपणच केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.

पत्नी सिध्दी ही वारंवार शिवीगाळ करायची व त्रास द्यायची. त्यामुळे तिचा खून केल्याची कबुली गजानन याने दिली आहे. खुनानंतर काही तासातच पोलिसांनी खुनाचा यशस्वी छडा लावला असून पोलिसांनी गजानन याच्या विरुध्द भादंवि कलम 302,201 अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकरणात सिध्दीच्या खुनामागे आणखी काही कारणे आहेत का? याचा तपास राजापूर पोलीस करीत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास राजापूरचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर करीत आहेत. या झालेल्या खुनामुळे परुळेमध्ये खळबळ उडाली आहे. आता पोलीस तपासात आणखी कोणती माहिती समोर येते त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे