राजापूर:- तालुक्यातील जैतापूर-हातीवले रोडवर पडवे स्टॉपजवळ मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. वळणावर ताबा सुटल्याने दुचाकी मोरीला धडकून खाली पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना १ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव कृष्णा पुजारी हा तरुण आपल्या मोटारसायकलने (क्रमांक MH 05 FN 1728) जैतापूरकडून हातीवलेच्या दिशेने जात होता. पडवे स्टॉपजवळ असलेल्या एका वळणावर गौरवचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या मोरीला (पूल) जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की, तो गाडीसह मोरीखाली असलेल्या खडकाळ भागात कोसळला.
साखर गावचे पोलीस पाटील रोहीदास गोविंद कांबळी (५३) हे एका लग्नासाठी जात असताना त्यांना पडवे स्टॉपजवळ हा अपघात झाल्याचे दिसून आले. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. या अपघातात गौरव पुजारी याला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव पुजारी याने आपली मोटारसायकल अतिवेगाने चालवून स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०६, १२५, १८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









