गुहागर:- गुहागर तालुक्यातील वेळंब पिंपळवाडी येथे एका तरुणाने दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे एक तरुण मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पक्षी मारण्याच्या बंदुकीचा ट्रिगर अचानक दबला गेल्याने त्यातील छरा लागून ही घटना घडली. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कु. मयुरी सखाराम पिंपळे (वय २१) ही शनिवारी, ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरुममध्ये मोबाईलचा चार्जर शोधत होती. त्याच वेळी आरोपी अल्पेश अनंत पिंपळे (वय २८) हा तिच्या पाठीमागून आला. अल्पेशच्या हातात पक्षी मारण्याची बंदूक होती. बंदूक हाताळत असताना अल्पेशने अत्यंत हयगयीने आणि निष्काळजीपणाने बंदुकीचा ट्रिगर दाबला. यामुळे बंदुकीतील छरे थेट मयुरीच्या डाव्या खांद्याला लागून शरीरात घुसले, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली.
या घटनेनंतर मयुरी पिंपळे हिने दिलेल्या तक्रारीवरून संशयित अल्पेश अनंत पिंपळे याच्यावर गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२५ ब गुन्हा नोंदवण्यात आला आहे.









