रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणातील मुख्य संशयित पंढरीनाथ आंबेरकर यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर शनिवारी (ता. ४) सुनावणी होणार आहे.
राजापूर-कोदवली येथील पेट्रोलपंपातून पेट्रोल भरून निघालेले पत्रकार शशिकांत शंकर वारीशे (वय ४५, रा. कशेळी) यांच्या दुचाकीला एका मोटारीने धडक दिली होती. या अपघातात वारीशेंचा मृत्यू झाला. वारीशे यांच्या अपघातानंतर हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. ज्याने धडक दिली त्या संशयित पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर सुरवातीला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता; मात्र वातावरण तापत गेल्यानंतर संशयित आंबेरकर यांच्याविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक करण्यात आली होती. पोलिसांकडून पत्रकार वारीशे हत्या प्रकरणाची चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केल्यानंतर जिल्हा पोलिसांनी १२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची एसआयटी स्थापन केली.









