नोकरीला लावण्याच्या नावाखाली तरुणांना 65 लाखांचा गंडा; भाट्येतील एकविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरीतील इंडियन कोस्टगार्ड येथे नोकरीला लावण्याच्या नावाखाली अनेक तरुणांकडून प्रत्येकी 50 हजार रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक झालेल्या तरुणाने याबाबत शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली असुन 65 लाखांच्या फसवणूक प्रकरणी मुनाफ अब्दुल रज्जाक भाटकर (रा. भाट्ये काटली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

विशाल सुभाष गुरव असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. विशाल याने दिलेल्या तक्रारीनुसार मुनाफ भाटकर याने 2017 ते 2019 या कालावधीत अनेक तरुणांना नोकरीला लावण्याच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा घातला आहे. फिर्यादी विशाल गुरव आणि त्याच्या सोबत असलेल्या अनेक मुलांना रत्नागिरी इंडियन कोस्टगार्ड येथे नावीक, जनरल ड्युटी, ड्रायव्हर ड्युटीकरीता नोकरीला लावतो असे सांगत प्रत्येक मुलांकडून 50 हजार याप्रमाणे 65 लाख रूपये उकळले. विशाल गुरव याला एसटी स्टँड येथे बोलावून 65 लाख इतकी रक्कम घेतली. मात्र, अनेक महिन्यांनी देखील नोकरी न मिळाल्याने अखेर विशाल गुरव याने शहर पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

विशाल गुरव याने दिलेल्या तक्रारीनुसार मुनाफ भाटकर याच्या विरोधात भादवि कलम 420 नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक यांनी या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे.