रत्नागिरी, खेडमधील लाभार्थी; ५९ लाख वितरित
रत्नागिरी:- रत्नागिरीसह खेड तालुक्यात २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीतील नैसर्गिक आपत्तीतील मंजूर २ कोटी ३ लाख ६४ हजारांच्या नुकसान भरपाईपैकी दोन्ही तालुक्यात केवळ ५९ लाख ७१ हजार रुपयांचा मोबदला लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे. यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पाठपुरावा केला होता; मात्र उर्वरित १ कोटी ४३ लाख ९३ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईची अद्यापही प्रतीक्षाच आहे.
अतिवृष्टीमध्ये रत्नागिरी तालुक्यासह खेड शहरातील व्यापारी, नागरिक आणि जगबुडी नदीकाठच्या रहिवाशांना मोठा फटका बसला होता. महसूल विभागाकडून नुकसानग्रस्तांचे रितसर पंचनामेही करण्यात आले. त्यानुसार रत्नागिरी तालुक्यातील नुकसानग्रस्तांना भरपाईपोटी ४३ लाख ८९ हजार ४५० रुपये तर खेड तालुक्यातील पूरग्रस्तांना १ कोटी ५९ लाख ७४ हजार ५७५ रुपयांच्या नुकसान भरपाईची आवश्यकता होती. दोन्ही तालुक्यांसाठी डिसेंबर २०२३ अखेर २ कोटी ३ लाख ६४ हजार रुपयांचा भरपाईपोटीचा मोबदला मंजूर झाला होता. त्यापोटी शासनाकडून रत्नागिरीसाठी १९ लाख ८५ हजार ५०० रुपये तर खेडसाठी ३९ लाख हजार ५०० रुपयांची भरपाई बाधितांना देण्यात आली. मोजक्याच नुकसानग्रस्तांना मोबदला वितरित करण्यात आला. उर्वरित बाधितांना भरपाईपासून वंचित राहावे लागले आहे. रत्नागिरीतील नुकसानग्रस्तांना २४ लाख हजार ९५० रुपये तर खेडमधील पूरग्रस्तांना १ कोटी १९ लाख ८९ हजार ५० रुपये भरपाई लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.