संगमेश्वर:- कोकण मार्गावरून धावणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसमधील इंजिनपासून 3 नंबरच्या जनरल डब्यात जागेवरून दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी तिघांवर शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून सार्वजनिक शांतता बिघडवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अमान साबीर काझी (24), सकलेन मुनीर मुल्ला (25, दोघे रा. कसबा-काझी मोहल्ला, संगमेश्वर), जितेंद्र जयवंत (42, कुंभाड-खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे एलटीटी-त्रिवेंद्रम नेत्रावती एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना पनवेल स्थानकादरम्यान दोन्ही गटांमध्ये शाब्दीक बाचाबाची होवून हाणामारी झाली होती. एक्स्प्रेस येथील स्थानकात आल्यानंतर याचे पडसाद उमटले. डब्यातच दोन्ही गटात राडा झाला. ही बाब पोलिसांना कळवल्यानंतर तातडीने दोन्ही गटातील संशयितांना ताब्यात घेतले. या राडयामुळे नेत्रावती एक्स्प्रेस अर्धा तास स्थानकात खोळंबली होती. पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा तिघांवर गुन्हा दाखल केला.









