75 टक्के अनुदानावर देणार पालेभाजी बियाण्यांचे किट
रत्नागिरी:- अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकर्यांना उभारी देण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून रब्बीसाठी भाजीपाला लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. 75 टक्के अनुदानावर पालेभाज्यांच्या बियाणे असलेले मिनी किट दिले जाणार आहे. प्रत्येक शेतकर्याला दहा हजार रुपये उत्पन्न मिळेल अशी तजवीज या माध्यमातून करण्यात आली आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने भातशेतीची दाणादाण उडवली. हाती आलेले पिक वाया गेल्यामुळे वर्षभरात खायचे काय असा प्रश्न निर्माण झाला. सर्वाधिक नुकसान नदी किनारी असलेल्या शेतकर्यांचे झाले आहे. नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत वाटप होणार आहे; मात्र त्यांना उत्पन्नाचे साधन मिळवून देण्यासाठी जि. प. कृषी सभापती महेश नाटेकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या कोविडमुळे सर्वच खात्यांना 33 टक्केच निधी मिळणार आहे. प्राप्त निधीतून शेतकर्यांसाठी पूरक अशी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सुमारे 6 हजार हेक्टरवर रब्बीची लागवड केली जाते. पालेभाज्या, फळभाज्या लागवडीतून हजारो रुपये शेतकरी कमवतात. त्यावर त्याची गुजराण होते. नुकसानग्रस्त शेतकर्यांसह सर्वांनाच दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन दिले तर उत्पन्नात वाढ होईल. या हेतुने कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळेल अशी बियाणे अनुदानावर दिली जाणार आहेत. यासाठी महाबीजकडे बियाण्यांची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या फंडातून सुमारे 3 ते 4 लाख रुपयांचा निधी मिळेल अशी अपेक्षा आहे. बियाण्यांचे मिनी किट तयार केले आहे. त्यात भेंडी, मुळा, चवळी, पाला, मेथीसारख्या भाज्यांची बियाणे ठेवली जातील. पंधरा ते वीस दिवसात त्यातून शेतकर्याला उत्पन्न सुरु होईल असा उद्देश कृषी विभागाचा आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद सेसमधून मच्छीमार विक्रेत्यांना अनुदानावर शितपेट्या देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या कृषी समितीच्या बैठकीत घेतला आहे. सेसमधून किती निधी उपलब्ध होईल. त्यावर किती जणांना लाभ मिळणार याचे लक्ष निश्चित केले जाणार आहे. ही संकल्पना उपाध्यक्ष नाटेकर यांनी मांडली होती आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलली आहेत.