Wednesday, September 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी निवेंडी येथे मँगो व कॅश्‍यू पार्कसाठी भूसंपादन मोबदला वाटप सुरू

निवेंडी येथे मँगो व कॅश्‍यू पार्कसाठी भूसंपादन मोबदला वाटप सुरू

पहिल्या टप्प्यात १५ कोटींचे धनादेश प्रदान

रत्‍नागिरी:- मँगो व कॅश्‍यू पार्कसाठी तालुक्‍यातील निवेंडी येथे करण्‍यात आलेल्‍या भूसंपादन प्रक्रियेचा मोबदला वाटपास सुरुवात झाली आहे. राज्‍याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत निवेंडी व तळेकरवाडी येथील पाच खातेदारांना सुमारे पंधरा कोटी रक्‍कमेचे धनादेश वाटप करण्‍यात आले. सुमारे 97 हेक्‍टर जागेसाठी 120 कोटी रुपये एमआयडीसीकडून महसूल विभागाला प्राप्‍त झाले आहेत.

रत्‍नागिरी व सिंधुदुर्ग जिल्‍ह्यासाठी आंबा व काजू उत्‍पादनांच्‍या अनुषंगाने मौजे निवेंडी व तळेकरवाडी येथे मँगो व कॅश्‍यू पार्कसाठी भूसंपादन करण्‍यात आले होते. राज्‍याचे उद्योगमंत्री यांनी स्‍थानिक फळांवर प्रक्रिया उद्योग उभारण्‍यासाठी पुढाकार घेतला होता. सुमारे शंभर हेक्‍टर जागेचे उद्दीष्‍ठ ठेवण्‍यात आले होते. यासाठी आवश्‍यक 97 हेक्‍टर जागा भूसंपादीत करण्‍यात आली आहे.

प्रक्रिया उद्योग या ठिकाणी वाढल्‍यास आंबा, काजू, फणस, करवंद, जांभूळ यावरील प्रक्रिया उद्योग वाढून स्‍थानिक फळांच्‍या शेतीला आर्थिक स्‍थिरता प्राप्‍त होणार आहे. याठिकाणाहून रत्‍नागिरी रेल्‍वेस्‍थानक व येऊ घातलेले विमानतळ सुमारे 40 किमी, जयगड बंदर 15 ते 20 किमी, महामार्गही जवळ असल्‍यामुळे वाहतुकीच्‍या दृष्‍टीने ही एमआयडीसी पुरक ठरणार आहे.

राज्‍याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी यात विशेष लक्ष घातले होते. मागील दोन वर्षापासून ही भूसंपादन प्रक्रिया सुरु होती. यातील अनेक अडचणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्‍वत: बोलून तर रत्‍नागिरीचे उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी बैठका घेऊन मार्ग काढले होते. या मँगो पार्कसाठी एमआयडीसीने दोन टप्‍प्‍यात सुमारे 120 कोटी रुपये उपलब्‍ध करुन दिले होते. या पैशाचे एमआयडीसीकडून महसूल विभागाकडे हस्‍तांतरण झाल्‍यानंतर याता खातेधारकांना वाटप सुरु झाले आहे. गणेशोत्‍सवाचा मुहुर्त साधत पालकमंत्री व राज्‍याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निवेंडी आणि तळेकरवाडीतील पाच खातेदारांना नऊ खात्‍यांसाठी सुमारे 15 कोटींचे वाटप केले. यावेळी जिल्‍हाधिकारी मनुज जिंदल व अधिकारी उपस्‍थित होते.