संबंधित व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास जयगड पोलीस ठाण्याकडून संपर्क साधण्याचे आवाहन
गणपतीपुळे:- रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी तळेकरवाडी येथील विजय पाटील यांच्या बंद असलेल्या चिरेखाणीत गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली . या अज्ञात व्यक्ती बाबत कोणाला माहिती मिळाल्या तात्काळ जयगड पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, निवेंडी तळेकरवाडी येथे चिरेखाण व्यावसायिक विजय पाटील यांची बंद चिरेखाण आहे. या चिरेखाणीत गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास एक पुरुष व्यक्ती बसलेल्या स्थितीत असल्याचे नजीकच असलेल्या अंकुश तांबे यांच्या खाणीवर कामाला असलेला कामगार भाऊसाहेब हनुमंत पटेकर याला दिसून आला. यानंतर याविषयीची तात्काळ माहिती त्यांनी जयगड पोलिसांना दिल्यानंतर याबाबत जयगड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता ही अज्ञात पुरुष व्यक्ती मयत स्थितीत आढळून आली. त्यानंतर या व्यक्तीचे वय पाहिले असता सुमारे 60 वयोगटातील हा अज्ञात पुरुष व्यक्ती असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. तसेच या अज्ञात पुरुष व्यक्तीचे कुठलेही नातेवाईक आढळून न आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे त्याचे नातेवाईक आढळून आल्यानंतर त्याचा मृतदेह ताब्यात देणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या अज्ञात व्यक्तीचा पंचनामा करताना त्याचे वर्णन केले असता त्याचा रंग काळसावळा असून उंची पाच फूट व केस वाढलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले .तसेच अंगावर कुठलेही कपडे नसून केवळ अंडर पॅन्ट असल्याचे दिसून आले आहे. ही व्यक्ती वेडसर स्थितीत खंडाळा परिसरात फिरत असल्याचे एका चिरेखाण कामगाराने पाहिले होते. त्यानंतर ही व्यक्ती निवेंडी तळेकरवाडी येथील बंद असलेल्या चिरेखाणीवर आढळून आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही अज्ञात व्यक्ती नक्की कुठल्या ठिकाणाची असावी याबाबत जयगड पोलिसांकडून शोध सुरू असून या अज्ञात व्यक्तीची कुणाला माहिती मिळाल्यास तात्काळ जयगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेचा पंचनामा जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालगुंड गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल गुरव , पोलीस हवालदार निलेश भागवत, मिलिंद कदम ,संदेश मोंडे , मनोज देसाई आदींनी केला असून अधिक तपास करण्यात येत आहे.









