निवळी बावनदी अपघात; ट्रक चालकाला दंडाची शिक्षा

रत्नागिरी:- अंदाजे साडेतीन वर्षांपूर्वी निवळी बावनदी रस्त्यावरील शेल्टीवाडी येथे ट्रक उलटून अपघात झाला होता. या अपघातात ट्रक चालकाच्या बेजबाबदारपणामुळे दोघांचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी न्यायालयाने चालकाला 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

अनिकेत लक्ष्मण बिडये (२७, रा. नांदगाव, कणकवली) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी नितीन पवार यांनी या खटल्याचा निकाल शुक्रवारी दिला. त्यानुसार २३ जून २०१८ रोजी अनिकेत बिडये हा नांदगाव कणकवली येथून फणसाने भरलेला आयशर ट्रक घेवून भिवंडी मुंबई येथे जात होता. मुंबई-गोवा महामार्गाला पाली-निवळी शेल्टीवाडी याठिकाणी असलेल्या उतारावर  अनिकेतचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटून अपघात झाला होता.या अपघातात  हौद्यामध्ये व केबिनमध्ये  बसलेले ७ जण गंभीर  जखमी झाले होते.यामधील देवेंद्र आत्माराम बिडये (४७) व जयवंत  कृष्णा बिडये (४५,दोन्ही रा. नांदगाव, कणकवली) यांचा मृत्यु झाला होता, या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी ट्रकचालक अनिकेत याच्याविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. तसेच न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड.प्रज्ञा तिवरेकर यांनी व मदतनीस  म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल दुर्वास सावंत यांनी काम पाहिले.