निवळी- जाकादेवी मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक

रत्नागिरी:-  तालुक्यातील निवळी ते जाकादेवी जाणार्‍या रस्त्यावर बेदरकारपणे ट्रक चालवून समोरुन येणार्‍या दुचाकीला धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना रविवार 27 ऑक्टोबर रोजी रात्री 8.40 वा. सुमारास घडली.

राघवेंद्र गुरण्णा गुळेद (रा.बिजापूर कर्नाटक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. या अपघातात दुचाकीस्वार संकेत देमाजी कुळ्ये (रा.खालगाव जाकादेवी,रत्नागिरी) गंभिर जखमी झाला आहे. रविवारी रात्री राघवेंद्र गुळेद हा आपल्या ताब्यातील 16 चाकी ट्रक (केए-32-एए-4729) मध्ये 34 टन कोळसा भरुन जयगड ते निवळी मार्गे भरधाव वेगाने जात होता. तो जाकादेवी सातपायरी येथून जात होता. त्याच सुमारास संकेत आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-बीबी-6451) घेउन समोरुन येत असताना ट्रकची दुचाकीला उजव्या बाजुस धडक बसून हा अपघात झाला. यात संकेतच्या उजव्या पायाचे हाड मोडून इतर लहान मोठ्या दुखापती झाल्या. अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने घटास्थळावरुन पळ काढला.