निवळी अपघातातील ‘त्या’ टॅन्कर चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटातील एलपीजी टन्कर आणि मिनीबस अपघातातील ‘त्या’ संशयित टॅन्कर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश महाविर यादव (रा. डी ११७, ए ब्लॉक, डी संजय कॉलनी, भाटी माईस पतेहपूर बेली, दक्षिण दिल्ली) असे या संशयित टॅन्कर चालकाचे नाव आहे.

अपघाताची ही घटना रविवारी (ता. ८) सकाळी साडेआठच्या सुमारास निवळी घाटात श्री जोईल यांच्या घरासमोरील उतारात घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पोलिस पाटील सौ. संजना संजय पवार (वय ४१, रा. निवळी, कोकजेवठार, रत्नागिरी) यांनी दिलेल्या खबरीनुसार संशयित चालक राजेश यादव (सध्या रा. चेंबूर, मुंबई) हा त्यांच्या ताब्यातील गॅस टॅन्कर (क्र. एनएल -०१ एन ४६२८) घेऊन जयगड ते मुंबई असा जात असताना निवळी घाटात श्री जोईल यांच्या घरासमोरील उतारात आल्यावेळी निष्काळजीपणे टॅन्कर चालवून समोरुन येणारी मिनीबस (क्र. एमएच-०२ ईआर ९६०३) हिला समोरुन ठोकर देऊन अपघात केला. ही बस चालक संकेत कृष्णकांत जागुष्टे (रा. चिपळूण ) हे चालवत होते. या अपघातामुळे बस मधील ३० प्रवाशांना किरकोळ तर काहीजण गंभीर जखमी झाले. तसचे गॅस गळतीमुळे संतोष शामराव बेंडखळे यांचे राहते घराला आग लागून घरातील साहित्य, वाहने, एक म्हैस व गाईचे वासरु भाजून जखमी झाले. तेच लहु साळुंखे यांच्या टपरीला देखील आग लागून नुकसान झाले. तसेच घरासमोर लावलेल्या रिक्षा (क्र. एमएच-०८ बीसी २३४५), मोटार (क्र. एमएच-१२, एलपी १९८९) तसेच दुचाकी (क्र. एमएच-०८ एए ५०९४) या वाहनांचे जळून नुकसान झाले. अपघातातील दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस पाटील सौ. संजना पवार यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित टॅन्कर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.